Blog Details

Post Images

ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, उद्या होणारी परीक्षा रद्द, परीक्षेची सुधारित तारीख दोन-तीन दिवसांत जाहीर होणार

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती 

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET)२८ जूनला होणार होती. मात्र,  ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. खबरदारीचा उपाय उद्या, रविवारी (२८ जून) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ठाणे परिसरातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांना दिलासा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. 

याबाबत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. आधीच नोंदणी केलेल्या कोणत्याही उमेदवाराला पुन्हाअर्ज करण्याची गरज नाही. तसेच नव्याने कोणतेही परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही.  टीईटीसारखी परीक्षा आयोजित करण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे नवीन तारखेचे नियोजन सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आतापर्यंत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. राज्यातील ३७ शहरांमध्ये टीईटी परीक्षा होणार होती. यासाठी १,७२८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती आणि सुमारे ६ लाख १२५ उमेदवार परीक्षा देणार होते. मात्र, ठाणे-भिवंडी परिसरात प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात आली आहे. पेपरफुटीमुळे अनेक उमेदवारांची मेहनत आणि नियोजन विस्कळीत झाले आहे. तरीही परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणातच घेण्याचा परिषदेचा निर्धार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. 

टीईटी परीक्षा टीईटी पेपर फुटला TET TET Paper Leak Teacher Eligibility Test

Share :

Write your comment

Cancel Reply