टीईटी परीक्षेसाठी जाताना दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी परिधान करण्यास मनाई
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६' (टीईटी) यंदा २८ जूनला होणार आहे. परीक्षेसाठी जाताना टीईटी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही परिधान करण्यास मनाई आहे आणि परीक्षेला जाताना परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एका ओळखपत्राची मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षार्थींसाठी या सूचना दिल्या आहेत.
नीट परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यंदापासून टीईटी परीक्षेचे नियम अधिक कठोर केले आहेत. परीक्षे दरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामकाजात कार्यरत असणाऱ्यांचे मेटल डिटेक्टरद्वारे झडती घेतली जाणार आहे तसेच बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.
प्रत्येक परीक्षार्थ्याचे फेस रिकग्निशन केले जाईल. संशयित परीक्षार्थीची आधार पडताळणीदेखील केली जाईल. मूळ विद्यार्थ्याऐवजी अन्य परीक्षार्थी प्रवेश करत असल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल. परीक्षा केंद्र आणि परिसर, परीक्षा दालनात बसविलेले सीसीटीव्ही हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित आहेत. परीक्षेदरम्यान 'कनेक्ट व्ह्यू'मध्ये तत्काळ संपर्कासाठी प्रत्येक परीक्षा केंद्र संचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष आणि राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे इंटरनेट फोन उपलब्ध असतील. या सुविधेमार्फत संबंधितांशी संपर्क साधता येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिला आहे.
Write your comment
Cancel Reply