एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ
राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सुमारे 86 हजार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना होणार लाभ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय, घरभाडे भत्त्यात (HRA) वाढ करत तो 8-16-24 टक्क्यांवरून 10-20-30 टक्के करण्यात आला असून वार्षिक वेतनवाढीचा दरही 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळ आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनवाढीची देयके टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आली होती.
Write your comment
Cancel Reply