Blog Details

Post Images

पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रम; घाबरून इंधन साठवू नका, सरकारचे आवाहन


ता. २६ : राज्यातील काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पसरल्यानंतर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, महाराष्ट्र शासनाने या अफवांचे खंडन करत राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधनाची साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या – इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) – यांनी संयुक्तपणे इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली आहे. राज्यभरातील इंधन साठा पुरेसा असून पुरवठा साखळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी महाराष्ट्रात कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपांकडे धाव घेत असल्याने काही ठिकाणी कृत्रिम गर्दी निर्माण झाली. प्रशासनाने ही परिस्थिती पूर्णपणे अफवांमुळे निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

सरकारने अनधिकृत इंधन व्यवहार, काळाबाजार आणि साठेबाजीवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. विशेषतः व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी किरकोळ पेट्रोल पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. संबंधित ग्राहकांनी घाऊक विक्रेत्यांकडूनच इंधनाची खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, तेल कंपन्यांनीही राज्यातील सर्व डेपो आणि पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा सुरू असल्याचा पुनरुच्चार केला आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकरद्वारे इंधनाचा पुरवठा करण्यात येत असून नागरिकांनी केवळ नेहमीच्या गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अफवांमुळे अचानक वाढलेली मागणी हीच काही ठिकाणी रांगा लागण्याचे मुख्य कारण ठरली. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

Petrol Diesel Fuel Supply IOCL पेट्रोल पंप अफवा

Share :

Write your comment

Cancel Reply