Blog Details

Post Images

वन प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - वनमंत्री गणेश नाईक 

ता. २३ - राज्यातील वन प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, तसेच वनजमिनींचे संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि ३०० कोटी वृक्षलागवड अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे नुकत्याच आयोजित आढावा बैठकीत दिले. 

‘वाटचाल वन विभागाची’ या  पुस्तकातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात यावी. यामुळे विविध उपक्रमांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि वेळेत अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. वन प्रशासन अधिक आधुनिक आणि परिणामकारक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भू-स्थानिक माहिती प्रणाली ई-ऑफिस आणि इतर डिजिटल साधनांचा व्यापक वापर वाढविण्यावर भर देण्यात यावा. डिजिटल गव्हर्नन्सच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेत गती, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे वन मंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम.श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम.एस.रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) विवेक खांडेकर, उपसचिव निकीता पांडे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गणेश नाईक वनमंत्री गणेश नाईक Forest Administration वन्यजीव संरक्षण ३०० कोटी वृक्षलागवड सह्याद्री अतिथीगृह Forest Minister

Share :

Write your comment

Cancel Reply