Blog Details

Post Images

आषाढी एकादशीनिमित्त चाळीसहून अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट गावातून  पंढरपूरसाठी एसटी उपलब्ध होणार 


 आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक श्री क्षेत्र पंढरपूरला जातात. या सर्व भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.  राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

गेल्या वर्षी आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाने 5,200 विशेष गाड्या सोडल्या होत्या आणि सुमारे 21 लाख भाविकांना या सुविधेचा लाभ घेतला होता. यंदाही महामंडळाने विशेष गाड्याचे नियोजन केले आहे व गाड्यांची संख्या वाढवली आहे.  भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभशौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. 

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा... या भावनेतून एसटी यंत्रणा संपूर्ण यात्रा काळात अहोरात्र सेवेसाठी तत्पर राहणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. भाविकांनी एसटीच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख सेवांचा लाभ घेत विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 

Ashadhi Ekadashi ST Bus पंढरपूर यात्रा प्रताप सरनाईक विठ्ठल दर्शन Pilgrimage Warkari

Share :

Write your comment

Cancel Reply